वरळीत सुरक्षित, जलद वाहतूक; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वाहतूक बेटाचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीतील लोटस चौक येथील वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वरळीकरांना या चौकातून सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे शक्य होणार असून वाहतूकही जलद होणार आहे. या बेटाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले.

वरळीचा लोटस चौक हा वर्दळीचा चौक आहे. इथून गाड्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असतेच, पण मोठ्या प्रमाणात पादचारीही ये-जा करत असतात. आज झालेल्या भूमिपूजना वेळी सचिन अहीर, सुनील शिंदे, नगरसेवक आशीष चेंबूरकर, दत्ता नरवणकर, हिंदुजा समूहाचे अशोक हिंदुजा आदी मान्यवर उपस्थित होते.

या बेटाच्या सुशोभीकरणामुळे चालकांना अधिक जागा उपलब्ध होणार असल्याने वाहतुकीचा वेगही वाढणार आहे. त्याचबरोबर पादचार्‍यांनाही सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार आहे. चौकात विविध लाकडी आकर्षक शिल्पे लावली जाणार आहेत. अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने याचा आराखडा आणि त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे वाहतूक बेटाचे सुशोभीकरण पालिका, इंडस्इड बँक व हिंदुजा फाऊंडेशन सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे.