
लव्ह जिहादविरोधात उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या बेकायदा धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत बरेली जिह्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. एक मुस्लिम तरुण हिंदू मुलीला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार येथील टिकाराम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी तरुण फरार झाला आहे.
टिकाराम पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुह्यानुसार शरीफनगर गावातील रफिक अहमद यांचा मुलगा उवेस अहमदने एका हिंदू मुलीशी ओळख वाढवली होती. त्यानंतर तो धर्म बदलण्यासाठी मुलीवर दबाव टाकत होता. याबाबत मुलीच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. लव जिहाद विरोधात आणलेल्या बेकायदा धर्मांतर विधेयक 2020 ला नुकतीच राज्यपालांनी मंजुरी दिली आहे, त्यानंतरचा हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.
मध्य प्रदेशमध्ये एकाला अटक
लव जिहाद प्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये पहिला गुन्हा दाखल झालेला असतानाच मध्यप्रदेशमध्येही पोलिसांनी एका मुस्लिम तरुणाला अटक केली आहे. सदर मुस्लिम तरुणांची पत्नी हिंदू आहे. तिच्यावर कुटुंबियांकडून उर्दू आणि अरबी शिकण्यासाठी दबाव टाकला जात होता. याबाबत सदर महिलेने तक्रार दाखल करताच पोलिसांनी एकाला अटक केली आहे.




























































