तीन वर्षांत केबल ब्रीज आणि उड्डाणपूल उभारणार, एलफिन्स्टन, महालक्ष्मीची कोंडी फुटणार!

374

सुरक्षेच्या कारणास्तव लोअर परळ पूल तोडल्याने एलफिन्स्टन (प्रभादेवी) आणि महालक्ष्मी पुलावर प्रचंड वाहतूककोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक मोझेस रोडवर उड्डाणपूल आणि केशवराव खाडय़े मार्गावर केबल ब्रीज बांधण्यात येणार आहे. तीन वर्षांत त्यावर 745 कोटी खर्च केले जाणार आहेत.
अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिकाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये पालिकेच्या माध्यमातून शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील पुलांची आवश्यक दुरुस्ती तर काही ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहेत.

जी/दक्षिण विभागातील महालक्ष्मी येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी विकास नियोजन आराखडय़ानुसार दोन नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांमुळे कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचे नियमन सुरळीत करण्यासही उपयोग होणार आहे. डॉ. ई. मोझेस मार्ग आणि केशवराव खाडय़े मार्गावर बांधण्यात येणाऱया या पुलांसाठी मे. स्पेक्ट्रम टेक्नो कन्सलटंट प्रा. लि. यांची तांत्रिक सल्लागार, तर ‘आयआयटी’, मुंबईची फेरतपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थांनी तयार केलेल्या आराखडय़ांना रेल्वे प्रशासनाने मंजुरीही दिली आहे. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत.

डिलाईल पूल नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार

  • डिलाईल पुलांचे बांधकाम पश्चिम रेल्वेकडून सुरू असून एकूण खर्च 125 कोटींपैकी 25.16 कोटी पालिकेने रेल्वेला दिले आहेत. हे काम नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणार आहे.
  • पालिकेच्या जी/दक्षिण प्रभागांतर्गत ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाईल पूल (लोअर परळ)च्या जोडरस्त्यांचे कामही पालिका करणार आहे.
  • यामध्ये जुने जोडरस्ते तोडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी 138.42 कोटींचा खर्च होणार आहे. मे. जीएचव्ही (इंडिया) प्रा. लि. कंपनी हे काम करणार आहे. पावसाळा सोडून 18 महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

कुठे काय होणार

  • दक्षिणेकडील केशवराव खाडय़े मार्गावरील पूल हा न्यू शेरीन थिएटरपासून हाजीअलीकडे जाणाऱया रोडपर्यंत होणार आहे. 803 मीटर लांबीचा हा पूल केबलचा असेल.
  • ई. मोझेस रोड-वरळी ते धोबीघाटकडे जाणाऱया मार्गावर हा 639 मीटर लांबीचा उड्डाणपूल असेल.
    चीनच्या कंपनीला कंत्राट

महालक्ष्मी स्टेशनजवळील पुलाचे काम मे. ऍप्को सीआरएफजी या कंपनीचे 65 टक्के भागीदार असलेली मे. ऍप्को इफ्राटेक प्रा. लि. व दुसरी भागीदार संस्था मे. सीआरएफजी (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) करणार आहे. हे काम पावसाळा वगळून तीन वर्षांत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या