लोअर परळमध्ये ‘माणुसकीची भिंत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सणासुदीनिमित्त गोरगरीबांच्या चेहऱयावर हसू फुलवण्यासाठी लोअर परळमधील पेनिन्सुला बिझनेस पार्क गेटच्या बाजूला ‘माणुसकीची भिंत’ उभी राहिली आहे. शुक्रवार, 27 ऑक्टोबर रोजी अभिनेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली. 31 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हा उपक्रम सुरू राहणार आहे. याअंतर्गत लोकांनी दान केलेले कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सायकली वापरण्याजोग्या बनवून त्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

सुनील शिंदे वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आयोजित तसेच पुंडलिक लोकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिली आणि देशातील सर्वात मोठी ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली आहे. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. ‘देणाऱयाने देत जावे आणि घेणाऱयाने घेत जावे’ अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. शुक्रवारी सायंकाळी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार सुनील शिंदे, रोटरी क्लबचे राजेश दीक्षित यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘व्ही फॉर ऑर्गन फाऊंडेशन’च्या माध्यमातून येथे अवयव दानाविषयीदेखील जनजागृती करण्यात येत आहे.

देणाऱ्याने देत जावे…

तुमच्याकडे सुस्थितीत, वापरण्यायोग्य असणारे कपडे, साडय़ा, ब्लँकेट, लहान मुलांचे कपडे, खेळणी, सायकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, रुग्णांना वापरण्यायोग्य वैद्यकीय उपकरणे, पॅकिंग खाऊ तुम्ही या उपक्रमाअंतर्गत दान करू शकता. ज्यांना ज्या वस्तूची गरज आहे ते ती वस्तू घेऊन जाऊ शकतात. ज्या सोसायटय़ांना एकत्रपणे वस्तू दान करायच्या आहेत त्यांनी फोन केल्यास वस्तू कलेक्ट केल्या जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली. संपर्क – 8108711318 / 9702203377.