लोअर परळ कारखान्यात डासांच्या अळ्यांवर ड्रोनचा हल्ला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारखान्यात डासांच्या अळ्या सापडल्याने गेल्या आठवड्यात खळबळ उडाली होती. या अळ्यांची तपासणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली होती. या डासांच्या अळ्यांसह कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वेने मुंबई महानगर पालिकेच्या मदतीने निर्जंतुकीकरणासाठी प्रथमच ड्रोनचा वापर करीत रसायनांचे फवारे मारण्याचा प्रयोग केला आहे.

पश्चिम रेल्वेचा लोअर परळ कारखान्यात डब्यांची डागडुजी वगैरे कामे सुरू असताना पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली होती. त्यात डासांच्या अंड्यांंची पैदास होऊन अळ्यांची निर्मिती झाल्याचा व्हीडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याने खळबळ उडाली. यानंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी तेथे भेट देऊन पाहणी करीत रेल्वे तसेच पालिका अधिकाNयांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर पीटलाइन मधील पावसाचे पाणी काढून टाकण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम तसेच हेवी ड्युटी मोटर बसविण्यात आल्या आहेत. तसेच कारखान्यात उघड्या असलेल्या ठिकाणी ताडपत्री अंथरणे, छत, ड्रेनेज गटार आणि यार्ड लाईनची नियमित स्वच्छता राखण्याचे रेल्वेने कबूल केले. संपूर्ण कारखाना परिसरात हवेतून ५०० मीटर उंचावरून रसायनांचे फवारे सोडून आकाशातून निर्जंतुकीकरण करण्यासाठी अत्याधुनिक अशा ड्रोन तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रोनद्वारे दररोज १५ लिटर रसायन दिवसांतून १२ तास फवारण्यात येणार आहे. ६५ प्रकारचे विषाणू, ४०० प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगसचे १०० जीवजंतू मारण्याची या रसायन फवारण्यामागचा हेतू आहे. ‘परे’चे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांनी मुख्य वर्कशॉप मॅनेजर तरूण हुरिया आणि टीमचे यासाठी अभिनंदन केले आहे.

ब्रिटीश काळात १८७६ मध्ये स्थापन झालेल्या लोअर परळ कॅरेज रिपेअर वर्कशॉपमध्ये पारंपारिक ते आधुनिक अशा एलएचबी कोचेसची देखभाल आणि दुरूस्ती केली जाते. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच वर्कशॉपच्या निर्जंतुकीकरणासाठी अत्याधूनिक ड्रोन यंत्रणा वापरल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.