एलटीटी-मडगाव डबल डेकर कायम राहणार! पहाटेऐवजी आता रात्री आठवडय़ातून चार वेळा धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण मार्गावरील एलटीटी -मडगाव एसी डबल डेकर मर्ज करण्याच्या नावाखाली बंद करण्याचा डाव दै. ‘सामना’ने बातमी प्रसिद्ध केल्याने उधळला गेला आहे. आदल्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर एक्प्रेस (ट्रेन क्र. 11085/11086- द्विसाप्ताहिक) यापुढे धावणार नसल्याची प्रेस नोट काढणाऱ्या मध्य रेल्वेने दुसऱ्या दिवशी घूमजाव केले. एसी डबल डेकर कायम धावणार असून तिची सकाळची वेळ (पहाटे 5.30 वा. ऐवजी आता रात्री 12.45 वा.) बदलल्याची प्रेस नोट काढली. त्यामुळे चाकरमान्यांना कोकणात सकाळी पोहचण्यासाठी आणखी एक गाडी मिळाली आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2015 मध्ये कोकण मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव  (ट्रेन क्र. 11085/11086) अशी वातानुकूलित डबल डेकर एक्प्रेस सुरू केली होती. या गाडीला बंद करीत असल्याचे मध्य रेल्वेने परवा जाहीर केले. तिला एलटीटी ते मडगाव  (ट्रेन क्र.11099/11100) या नवीन गाडीशी मर्ज करून तिच्या दर आठवडय़ाला गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशा चार फेऱ्या चालविण्याचे जाहीर केले.

आणि रेल्वेला उपरती झाली

डबल डेकर गाडय़ांना मुंबई ते अहमदाबाद वगळता देशात इतरत्र कुठेही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. सुरुवातीला आठ डबे डबल असणाऱ्या गाडीला नंतर मेंटेनन्सच्या कटकटीमुळे केवळ चारच डबे डबल ठेवण्यात आले. या गाडीला पनवेल स्थानकात फलाट क्र. 5 वर थांबा देताना रेल्वेच्या सुरक्षा नियमांची आडकाठीही येत असल्याने रेल्वेला अडचण येत आहे. त्यामुळे ही ट्रेन मध्य रेल्वेला नकोशी झाली होती. परंतु मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ असल्याने ही ट्रेन बंद करणे परवडणार नसल्याने रेल्वेने घूमजाव केले आहे.

डबल डेकरचे नवे वेळापत्रक

ट्रेन क्र. 11099-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 4 नोव्हेंबरपासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रा. 12.45 वा. सुटेल आणि मडगाव येथे स. 11.30 वा. पोहोचेल

ट्रेन क्र. 11100-ही परतीच्या प्रवासाची गाडी 4 नोव्हेंबरपासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दु. 12.45 वा. मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रा. 11.25 वा. पोहोचेल

थांबे-ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी

डब्यांची रचना-1 फर्स्ट एसी कम एसी टू टीयर, 1 एसी टू टीयर, 8 एसी थ्री टीयर, 6 स्लीपर  क्लास, 3 जनरल सेकंड क्लास, 1 जनरल सेकंड क्लाससह गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 जनरेटर व्हॅन आणि एक पॅण्ट्री कार