
लंपी आजाराचा शिरकाव आता परळी तालुक्यात झाल्याचे दिसून आले आहे. आधीच बीड जिल्ह्यात जनावारांमध्ये हा आजार वाढत चाललेला आहे. या लंपी आजारामुळे आर्थिक घडी बिघडण्याची भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यामध्ये सध्या लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आलेला आहे.
याआधी जिल्ह्यातील आष्टी,अंबाजोगाई, केज नंतर आता आता परळी तालुक्यात देखील लंपी आजाराने ग्रासलेली जनावरे दिसून आली आहेत. परळी तालुक्यातील हिवरा या गावातील शेतकरी रोहिदास निर्मळ यांच्या दोन गायींना या आजाराची लक्षणे दिसुन आली आहेत. शासनाने या आजारावर वेळेतच उपाययोजना केल्या नाही तर हा आजार वाढुन मोठ्या प्रमाणावर पशु हानी होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे.























































