जन्मदिन विशेष – धोनी निरोप समारंभाच्या सामन्याचा हकदार!

693

विठ्ठल देवकाते

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 15 वर्षे मर्दुमकी गाजविणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द आता मावळतीकडे झुकलीय. यशस्वी कर्णधार…कल्पक नेतृत्व… शांत, संयमी स्वभाव… संकटमोचक… ग्रेट फिनिशर…हेलिकॉप्टर शॉट…अशा बहुआयामी गुणांमुळे धोनीने क्रिकेटमध्ये आपला वेगळा दरारा निर्माण केलाय. कर्णधारपदाच्या कारकिर्दीत दोन जगज्जेतेपद…कसोटी क्रमवारीत संघाचे अव्वल स्थान…आयपीएलमध्ये दोन विजेतेपदे…चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद… अशी क्रिकेटमधील बहुतांश विजेतेपदे ही त्याच्या परिसस्पर्शी नेतृत्वाची साक्ष देतात. ‘टीम इंडिया’चा हा माजी कर्णधार आज (दि. 7 जुलै) वयाची 39 वर्षे पूर्ण करून चाळीशीत पदार्पण करतोय. वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिलेला धोनी सध्या सेंद्रिय शेतीत रमलाय. लॉकडाऊनमुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबल्याने धोनीला निरोप समारंभाचा सामना खेळायला मिळेल की नाही, ही चाहत्यांची धाकधूक आता वाढलीय. धोनीचा आज जन्मदिन असला, तरी ‘टीम इंडिया’तील पुनरागमनासाठी त्याचं हेच वाढणारं वय आता अडथळा ठरण्याची शक्यता आहे.

झारखंडमधील रांचीसारख्या शहरातून आलेल्या महेंद्रसिंग धोनीने वयाच्या 23 व्या वर्षी म्हणजे 23 डिसेंबर 2004 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. बांगलादेशविरुद्धच्या या लढतीत पहिल्याच चेंडूवर तो धावबाद झाला होता. मात्र, आपल्या बिनधास्त फलंदाजीच्या जोरावर अल्पावधीत त्याने क्रिकेटविश्वावर मोहिनी घातली. वरिष्ठ खेळाडूंच्या गैरहजेरीत धोनीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ला पहिल्या टी-20 वल्र्ड कपसाठी दक्षिण आप्रिâकेच्या स्वारीवर पाठविले. या मिळालेल्या संधीचे सोने करून धोनीने खिसगणतीत नसलेल्या हिंदुस्थानला जगज्जेते बनवले अन् मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याच्या फलंदाजी भात्यात पुस्तकी फटक्यांपेक्षा वेगवेगळी अजब अशी अस्त्रे होती. त्यातील हेलिकॉफ्टर शॉटचा तो संकटकामी ब्रह्मास्त्राप्रमाणे वापर करायचा. त्याच्या डोक्यातील भन्नाट कल्पना तो मैदानावर वापरायचा. टी-20 वर्ल्ड कपमध्येच पाकिस्तानविरुद्ध बॉल आउटपर्यंत रंगलेल्या लढतीत धोनीने मुख्य गोलंदाज सोडून वीरेंद्र सेहवाग, रॉबिन उथप्पा यांच्या हाती चेंडू सोपविला होता. अंतिम लढतीतही त्याने ज्याचा आता सध्या लवकर चेहराही आठवायचा नाही त्या जोगिंदर शर्माच्या हाती अखेरचे षटक सोपविण्याचा यशस्वी जुगार खेळला होता. प्रतिस्पर्धी संघाला बुचकळ्यात टाकणाNया धोनीच्या निर्णयामुळे ‘टीम इंडिया’ने विजयामागून विजय संपादन केले. ‘टीम इंडिया’ला नंबर वनच्या सिंहासनावर बसविण्यात धोनीचा सिंहाचा वाटा होता. तब्बल 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेत जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपविला होता. धोनीने हिंदुस्थानला एशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपदही मिळवून दिले आहे.

‘आयपीएल’च्या 13व्या सत्रात चमकादार कामगिरी करून ‘टीम इंडिया’त पुनरागमन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने कंबर कसली होती. ‘टी- वल्र्डकप’मध्ये हा धुरंधर क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल, अशी चर्चा होती. मात्र, कोरोनामुळे देशात टाळेबंदी करावी लागल्याने आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यामुळे आता धोनीचे टी-20 वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे येणारा काळच ठरवेल. धोनीची सोनेरी कारकीर्द बघता, तो नक्कीच सचिन तेंडुलकरप्रमाणेच जल्लोषी निरोप समारंभाच्या सामन्याचा हकदार आहे. मात्र, सौरव गांगुली, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग अशा महारथी खेळाडूंनाही निरोप समारंभाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता धोनीच्या बाबतीत काय घडते, ते देवच जाणे.

धोनीची 15 वर्षांची कारकीर्द
2004- पदार्पण
2005 – सर्वाधिक धावांची खेळी करणारा यष्टीरक्षक
2006 – अव्वल फलंदाज
2007 – टी-20 वर्ल्ड कप/खेलरत्न
2008 – सर्वोत्तम खेळाडू
2009 – पद्मश्री
2010- एशिया कप/आयपीएल/चॅम्पियन्स लीग
2011 – वल्र्ड कप/आयपीएल
2012 – 100 विजय मिळविणारा कर्णधार
2013 – चॅम्पियन्स ट्रॉफी
2014 – चॅम्पियन्स लीग
2015 – 100 विजय मिळविणारा वन डे कर्णधार
2016 – एशिया कप/ यष्टीमागे 700 बळी
2017 – 100 अर्धशतके/100 यष्टिचित
2018 – आयपीएल/पद्मभूषण
2019 – 350 वन डे

आपली प्रतिक्रिया द्या