मॅकडॉनल्डस्चे सीईओ ईस्टरब्रूक यांची हकालपट्टी,सहकर्मचाऱ्याशी संबंध भोवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टिव्ह ईस्टरब्रूक यांची मॅकडॉनल्डस्च्या सीईओ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सहकर्मचाऱ्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून ईस्टरब्रूक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 2015 पासून ते सीईओ पदावर कार्यरत होते. त्यांनी मॅकडॉनल्डस्च्या संचालक मंडळातूनही राजीनामा दिला आहे. सहकर्मचाऱ्याशीच संबंध ठेवून ईस्टरब्रूक यांनी कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे मॅकडॉनल्डस्ने ही कारवाई केली आहे.

जगातील सर्वात मोठी फूड कंपनीपैकी एक असलेल्या मॅकडॉनल्डस्च्या सीईओपदी आता कंपनीच्या अमेरिकेतील शाखेचे प्रमुख क्रिस केम्पजिंस्की विराजमान झाले आहेत. या कारवाईनंतर ईस्टरब्रूक यांनी ईमेलद्वारे कंपनीच्या निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या कार्यकाळात मॅकडॉनल्डस्च्या शेअर्सची किंमत दुप्पट झाली होती. यादरम्यान ईस्टरब्रूक यांचे वेतन 2.2 कोटी डॉलरवर (153 कोटी रुपये) पोहोचले होते. मॅकडॉनल्डस्चे नवे सीईओ क्रिस केम्पजिंस्की 2015 मध्ये मॅकडॉनल्डस्मध्ये रूजू झाले होते. अमेरिकेत तब्बल 14 हजारांहूनही अधिक मॅकडॉनल्डस् रेस्टॉरंट सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.