
राज्यात गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊसतोडणीसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने बाहेरच्या राज्यांकडून ऊसतोडणी यंत्र मागवले आहे. महासंघाच्या या मागणीस गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि इतर काही राज्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. एप्रिलअखेरीस ही यंत्रे राज्यात दाखल होतील आणि अतिरिक्त ऊसतोडणीचे काम मार्गी लागेल, असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.
यंदा देशात मान्सून वेळेवर हजर होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र्ा विभागाने वर्तवला आहे. या अंदाजामुळे साखर कारखान्यांत कार्यरत ऊसतोड मजूर आपापल्या गावी परतले आहेत. महाराष्ट्रातील ऊसगाळपाचा हंगाम संपत आला असून, अद्यापि 90 लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी नुकतीच साखर उद्योग क्षेत्रातील भागीदारांची एक व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्याबाहेरील कारखान्यांना महाराष्ट्रात ऊसतोडणी यंत्रे पाठवण्याची विनंती केली आहे. राज्यातील मराठवाडा विभागातील परभणी, जालना आणि हिंगोली जिह्यांत प्रामुख्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. याखेरीज राज्याच्या अन्य भागांतही उसाचे गाळप व्हायचे आहे.
राज्याबाहेरील ऊसतोडणी यंत्रे एप्रिलपर्यंत राज्यात दाखल होतील. याखेरीज पश्चिम महाराष्ट्रातील ज्या कारखान्यांच्या गाळपाचे काम पूर्ण झाले आहे, त्या कारखान्यांकडील ऊसतोडणी यंत्रेही मराठवाडय़ातील जिह्यांकडे रवाना करण्यात येणार असल्याचे नाईकनवरे म्हणाले आहेत.
ऊसतोड मजुरांकडून दिवसाकाठी दीड एकर ऊस तोडून होतो. या तुलनेत मध्यम आकाराच्या ऊसतोडणी यंत्राच्या माध्यमातून एका दिवसात 5 ते 6 एकरावरील ऊस तोडून होतो. ऊसतोडणी यंत्रांची ऊस तोडण्याची क्षमता लक्षात घेता राज्यातील गाळपाच्या प्रतीक्षेतील उसाच्या तोडणीचे काम मे महिन्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले आहे.























































