
सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना आपल्या कार्यक्षेत्रातील अवैध वाळू उत्खनन व कामातील अनियमितता प्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निलंबित केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तहसीलदार विनोद रणवरे यांची विभागीय स्तरावर चौकशी सुरू होती. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर आले असताना अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. निलंबन कालावधीत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
माढा तालुक्यातील उजनी धरण कार्यक्षेत्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तहसीलदार विनोद रणवरे यांची चौकशी करून निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. चौकशीत कार्यालयप्रमुख या नात्याने कामकाजावर नियंत्रण नसणे, अवैध वाळूउत्खनन व वाहतूक प्रकरणात कारवाई न करणे, खाणपट्टा मंजुरीच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयात अहवाल न देणे, असा गंभीर ठपका ठेवण्यात आला होता. विभागीय स्तरावर चौकशी होऊन तहसीलदार विनोद रणवरे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण न ठेवणाऱ्या तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदार व पदाधिकाऱ्यांत प्रचंड मतभेद आहेत. त्यामुळे यापुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमसभेत नागरिकांकडून तक्रारींचा ओघ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीवरून त्यांची जनतेसमोर झाडाझडती झाली होती. माढाचे तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून विनोद रणवरे यांनी त्यांची विशिष्ट अशी कार्यपद्धती अवलंबिली होती. वाळूमाफिया, अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक प्रकरण, पाणंद रस्ता, शेतजमिनीवर नोंद, अशा विविध कामांत त्यांच्या एका विशिष्ट कार्यपद्धतीमुळे ते चर्चेत आले होते. तसेच एका खासगी व्यक्तीचा राजरोसपणे महसूल प्रशासनात वावर अनाकलनीय ठरत होता. आमसभेत या कार्यपद्धतीचा जनता व नेतेमंडळींकडून जाब विचारण्यात आल्यावर तहसीलदार रणवरे यांना समर्पक उत्तरे देता आली नव्हती. आमसभेत एका महिलेने पाणंद रस्त्याचा विषय चव्हाट्यावर आणला होता.