परीक्षण – गद्दारीचा पंचनामा

>> माधव डोळे

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते आतापर्यंत 20 मुख्यमंत्री झाले. 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून मंगल कलश आणला. प्रदीर्घ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये राज्यात असंख्य राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राजकीय पडद्यावर तसेच पडद्यामागूनही अनेक हालचाली झाल्या, पण सात महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या बगलबच्च्यांनी जे घाणेरडे राजकारण केले, तसे राजकारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही झाले नाही. ज्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातचे राखून न ठेवता सर्व पदे दिली, त्याच एकनाथ शिंदे यांनी ‘मातोश्री’च्या पाठीत खंजीर खुपसला आणि मुख्यमंत्रीपद पटकावले. ‘सुरत व्हाया गुवाहाटी व्हाया गोवा’ अशी मजल दरमजल करीत शिंदे यांनी भाजपच्या मदतीने निव्वळ सत्तेसाठी गद्दारी केली. त्या काळात ज्या स्पह्टक घडामोडी घडत होत्या, त्यावर ज्येष्ठ पत्रकार व कट्टर शिवसैनिक दिलीप मालवणकर यांनी वेळोवेळी सोशल मीडियावर अत्यंत परखड शब्दांत लेख लिहिले. हे सर्व लेख प्रचंड गाजले. याच लेखांचे संकलन असलेले ‘गद्दारांना क्षमा नाही’ हे पुस्तक अस्मिता प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

या पुस्तकामध्ये एकूण 45 लेख असून सात महिन्यांमध्ये घडलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा परामर्श घेण्यात आला आहे. आकर्षक मुखपृष्ठ तसेच उत्कृष्ट मांडणी यामुळे हे पुस्तक थोडय़ाच काळात चर्चेचा विषय बनले आहे. मालवणकर हे केवळ पत्रकारच नव्हे, तर लेखक व कवी असून त्यांची आतापर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ज्या भावना कवितेतून मांडता येणे शक्य नाही, त्या लेखांच्या स्वरूपात कोणतीही भीडभाड न ठेवता त्यांनी व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला असून अनेक राजकीय समीक्षक तसेच विश्लेषक आपापल्या पद्धतीने भाष्य करीत आहेत, पण सोशल मीडियावर मालवणकर यांनी लिहिलेला प्रत्येक लेख गाजला.

शिवसेनाप्रमुखांच्या तडाखेबंद व तेजस्वी विचारांचा पगडा लेखकावर असल्याने त्यांच्या लेखणीलादेखील तेवढीच धार आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा सहवास लेखकाला अतिशय जवळून लाभला. दिघे यांच्या कामाची पद्धत त्यांना पूर्णपणे माहीत होती. विशेषतः 1989च्या ठाण्यातील महापौरपदाच्या निवडणुकीत काही नगरसेवकांनी गद्दारी केली आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश परांजपे यांचा पराभव झाला. त्यानंतर ‘‘गद्दारांना क्षमा नाही…’’ असा एकच आवाज घुमला. सात महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी तीच गद्दारी केल्याने हा इतिहास पुन्हा जागा झाला. 1989च्या गद्दारांना जशी क्षमा केली नाही, तशीच 2023मध्ये गद्दारी केलेल्यांनादेखील महाराष्ट्र कदापिही क्षमा करणार नाही, असा एकच संदेश लेखकाने या पुस्तकातून दिला आहे.

सोशल मीडियावर लिहिलेल्या या लेखांचे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आलेख ठरला आहे. आपल्या मनोगतात लेखक म्हणतात, ‘‘एकीकडे ज्येष्ठ-श्रेष्ठ म्हणवणारे बोरूबहाद्दर पत्रकार सत्ताधाऱयांची ‘री’ ओढत त्यांचे उदात्तीकरण करण्यात दंग होते, तर मी प्रवाहाविरोधात जाऊन सत्ताधीश मदमत्तांना लेखणीची तलवार करून रोज झोडपत होतो.’’ ‘गद्दारांना क्षमा नाही’ या पुस्तकातील कोणताही लेख उघडून वाचला तरी वाचकाच्या मनात अंगार पेटल्याशिवाय राहणार नाही. गद्दारांविरोधात चीड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पुस्तकातील लेखांचे मथळे हे आचार्य अत्रे यांची आठवण करून देणारे आहेत. उदाहरणेच द्यायची असतील तर ‘शिंदेचे झाले वांदे… जमवले नाराज कांदे’, ‘तुमचं बापाचं काळीज तुटलं… पण तुम्ही तर बापालाच लुटलं’, ‘तोंड काळे करून घेण्याचा छंद… तुमची कामाख्या देवी तर आमची भराडीदेवी’, ‘भूपंप कसला करतोस… पादल्याची दुर्गंधी सुटेल’ या मथळय़ांचे देता येईल.

पुस्तकातील प्रत्येक लेख हा वाचनीय असून मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केले व लाखो मराठी माणसांच्या मनात घर केले, त्याचे तेंडभरून काwतुक केले आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही व पुन्हा होणार नाही, याच भावना लेखकाने व्यक्त केल्या आहेत. गद्दारी करून सत्ता हिसकावून घेणाऱयांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. पिंबहुना, एक ना एक दिवस जेव्हा सत्ता जाईल, तेव्हा या गद्दारांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ होणार असल्याचेही पुस्तकात स्पष्टपणे म्हटले आहे. हे सर्व परखड लेख लिहिताना लेखकाला अनेकदा धमक्यादेखील आल्या, पण त्याला भीक न घालता मालवणकर यांनी आपल्या मनातील विचार परिणामांची तमा न बाळगता मांडले. या पुस्तकाला डॉ. शिवरत्न शेटे यांची प्रस्तावना असून शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांचा अभिप्राय आहे. हे पुस्तक म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात निर्माण झालेल्या भावनांचे आणि चिडीचे प्रतिबिंब आहे. ‘गद्दारी’च्या या पंचनाम्याची दखल महाराष्ट्रातील राजकीय पंडित तसेच आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्यास हात आखडता घेणाऱया तथाकथित साहित्यिकांना घ्यावीच लागेल.

‘गद्दारांना क्षमा नाही’

लेखक – दिलीप मालवणकर

प्रकाशक – अस्मिता प्रकाशन

पृष्ठ – 126, किंमत – 250 रु.