होळी पेटली! भटक्यांची पंढरी मढीमध्ये होळी पेटवण्यावरून दोन गटात वाद

465

कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतलेल्या तालुक्यातील मढी येथे होळी पेटवण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाचा असून तो आम्हाला मिळावा अशी मागणी गोपाळ समाजहित महासंघाने केली होती. परंतु ही मागणी तहसीलदार नामदेव पाटील यांनी फेटाळली असून हा वाद सक्षम न्यायालयात मिटवा तसेच होळीच्या दिवशी कायदा सुव्यवस्था दोन्हीही गटाने राखावी अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही या आदेशात पाटील यांनी दिला आहे.

मढी येथे दरवर्षी गोपाळ समाजाची होळी नियुक्त केलेल्या मानकऱ्यांच्या हस्ते पेटवली जाते. ही होळी कोणी पेटवायची यावरून पूर्वी मोठे वाद झाले होते. मात्र हा वाद पाथर्डी न्यायालयासमोर आल्या नंतर न्यायालयाने 25 नोव्हेंबर 1999 ला दोन्हीही गटात सुलेनामा करत गोपाळ समाजातील माणिक लोणारे, जगन्नाथ माळी, हरिभाऊ हामरे, हरिदास काळापहाड, पुंडलिक नवघिरे, सुंदर गिऱ्हे यांना होळी पेटवण्याचा मान दिला. या निकालानंतर दोन ते तीन वर्ष मढी येथील होळी तणावाच्या वातावरणातच पेटवली गेली. मात्र त्या नंतर कोणताही अनुचित प्रकार न होता होळी शांततेत पेटवण्यात येत आहे. मात्र या वर्षी ही होळी आम्हीच पेटवणार व तशी परवानगी महसूल व पोलीस प्रशासन तसेच देवस्थान समितीने आम्हाला द्यावी अशी मागणी गोपाळ समाजाच्या गोपाळ समाजहित महासंघाने केली होती.

या संदर्भात केलेल्या मागणी पत्रात जे सध्याचे मानकरी आहेत ते धनदांडगे व सुशिक्षित असून त्यांनी जाणीवपूर्वक आपल्याकडे हा मान ठेवलेला आहे. न्यायालयासमोर जो सुलेनामा करण्यात आलेला आहे, त्यात दरवर्षी मानकरी बदलले जावे असा दावाही महासंघाने आपल्या मागणीत केला होता. हा मान या वेळी गोपाळ समाजाचे पुंडलिक धनगर, शंकर पवार, बाळासाहेब पवार, भाऊसाहेब चौगुले, भरत गव्हाणे, पोपट गव्हाणे यांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आल्यानंतर तहसीलदार नामदेव पाटील यांनी सध्याचे मानकरी, गोपाळ समाजहित महासंघाने ज्यांची नावे सुचवली ते मानकरी व देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांचे जबाब नोंदवून घेतले होते.

सध्या अधिकार असलेल्या मानकऱ्यांनी न्यायालयाने आमचीच नेमणूक केली असल्याचा दावा केला तर समाजहित महासंघाने दरवर्षी मानकरी बदलावे असे सुलेनाम्यात म्हटले असल्याचा दावा केला. शिवशंकर राजळे यांनी हा विषय देवस्थान समितीच्या अखत्यारीत नसल्याचा जबाब दिला. या सर्वांचे सर्व जबाब नोंदवल्या नंतर तहसीलदार नामदेव पाटील यांनी गोपाळ समाजहित महासंघाचा अर्ज निकाली काढला असून या संदर्भात दिलेल्या आदेशात पाटील यांनी म्हटले आहे की, हा विषय सामाजिक ऐक्याशी निगडित असून हा वाद या पूर्वीच न्यायालयासमोर येऊन त्या वेळी सुलेनामा करण्यात आलेला आहे. हा सुलेमामा केल्या पासून सध्याचे मानकरी होळी पेटवण्याचे काम करत आहेत. दोन्हीही गटाच्या मानकऱ्यांनी या सुलेनाम्याचे जे अर्थ काढले आहेत त्यावर निर्णय घेणे हे महसूल प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने समाजहित महासंघाने केलेली मागणी फेटाळण्यात येत असून या विषयावर त्यांनी सक्षम न्यायालयात दाद मागावी. येत्या होळीच्या दिवशी दोन्हीही गटाने मढी येथील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची खबरदारी घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेशाच्या शेवटी नामदेव पाटील यांनी स्पस्ट केले आहे.

पाटील यांनी हा वाद निकाली काढला असला तरीही या निर्णयाला स्थगिती मिळवण्यासाठी आता गोपाळ समाजहित महासंघाने पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागण्याचे प्रयत्न सुरु केले असून यावर न्यायालय काय निर्णय देणार तसेच येत्या 9 मार्च रोजी होणाऱ्या होळी सणापूर्वी हा निवाडा होणार काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या