खंडणी मागण्यासाठी त्यांनी केले म्हशींचे अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील काही गुंडानी चक्क खंडणी मागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या दोन म्हशींचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या गुंडांपैकी मुख्य गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून एक म्हस ताब्यात घेण्यात आली आहे. अद्याप पाच जण फरार असून दुसरी म्हैस त्यांच्या ताब्यात आहे.

मध्यप्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील आदिवासी भागात राहणारे अमरचंद पटेल हे त्यांच्या म्हशींना पिकअप वॅनमधून दुसऱ्या गावात घेऊन जात होते. दरम्यान पावेल गावाजवळ दबा धरुन बसलेला आरोपी दीपचंद आणि त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने अमरचंद यांची गाडी थांबवली आणि दोन म्हशींना घेऊन पसार झाले.

अमरचंद घरी आल्यानंतर काही वेळाने त्यांना आरोपीचा फोन आला. म्हशी हव्या असतील तर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील. आरोपींनी खंडणीची मागणी केल्याने एवढे पैसे कुठून आणणार या विचाराने घाबरलेल्या अमरचंद यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. प्रभात पट्टन पोलिस चौकीत आरोपींविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपी दीपचंद याला 23 डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले.

अमरचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अपहरण झालेल्या दोन म्हशींपैकी एका म्हशीचा शोध घेण्यात यश आले आहे. परंतु पाच आरोपी आणि एक म्हैस याबाबत अजून पत्ता लागलेला नाहीये. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.