
लग्नापूर्वी ढोकळा खाऊन तब्येत बिघडल्याने एका नववधूचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे घडली आहे. लग्नाच्या काही वेळ आधीच ही घटना घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये बुधवारी बाजार येथे राहणाऱ्या प्रमोद महादेवराव काळे यांची मुलगी मेघा हिचा विवाह ठरला होता. 20 मे रोजी तिचा विवाह संपन्न होणार होता. तिच्या विवाहानिमित्त घर सजलं होतं. 19 मे रोजी मेघाच्या विवाहापूर्वीचे सगळे विधी सुरू झाले होते.
मेघाने विधींना बसण्यापूर्वी न्याहारी करण्याचं ठरवलं. न्याहारीत तिला ढोकळा देण्यात आला. ढोकळा खात असताना तिला अचानक जोरदार ढास लागली. प्रचंड खोकला सुरू झाला. त्यामुळे तिला पाणी देण्यात आलं. पण, तिची परिस्थिती बिघडली. तिला एकही शब्द उच्चारता येईना. घरात एकच गोंधळ उडाला.
तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिथे तिचा मृत्यू झाला. मेघा ही स्वतः व्यवसायाने डॉक्टर होती. तिने एमबीबीएस केलं होतं. मुंबईत एका रुग्णालयात ती प्रॅक्टिस करत होती. तिचा विवाह ठरल्यानंतर काळे कुटुंबात उत्साहाचं वातावरण होतं.
मात्र, मेघाच्या अशा अचानक मृत्युमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी मेघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून ती खात असलेल्या ढोकळ्याचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या दोन्ही अहवालांनंतरच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.




























































