बस कालव्यात कोसळली, 54 प्रवाशांपैकी 47 जणांचे मृतदेह सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या सिधी जिह्यात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास प्रवासी बसला भीषण अपघात झाला. बस 22 फूट खोल कालव्यात कोसळली. सायंकाळपर्यंत 47 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. बसमधील 54 प्रवाशांमध्ये विद्यार्थी व त्यांचे पालक होते. विद्यार्थ्यांना सतना येथील परीक्षा केंद्रावर वेळेत घेऊन जाण्यासाठी चालकाने शॉर्टकट मारला होता. सात प्रवाशांना दोघा भावंडांनी वाचवले, तर बसचालक पोहत बाहेर आला.

रामपूर नॅकिनजवळील सरदा गावात ही दुर्घटना घडली. सिधी जिह्यातून सतनासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 39 वरून वाहने जातात. मात्र या रस्त्यावर वाहतूककाsंडी होते. बसमधील विद्यार्थी रेल्वे, एनटीपीसी व नर्सिंगची परीक्षा देण्यासाठी चालले होते. विद्यार्थ्यांना वेळीच परीक्षा केंद्र गाठायचे होते. त्यांच्या विनंतीवरून चालकाने बसचा मार्ग बदलला होता. दुर्दैवाने परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. 22 फूट खोल बाणसागर कालव्यात त्यांची बस कोसळली. दुर्घटनेतील 47 मृतांमध्ये 25 पुरुष, 20 महिला आणि 2 मुलाचा समावेश आहे. बसमध्ये 32 प्रवाशांची आसन क्षमता होती. मात्र चालकाने 54 प्रवासी बसवले होते. कालव्यात बाणसागर जलाशयातील पाणी सोडले जाते. पाण्याच्या प्रवाहाला गती असल्यामुळे प्रवासी वाहून गेले. बस कालव्यात पूर्णपणे बुडाली होती. चार तासांनंतर बस बाहेर काढण्यात आली.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 7 लाखांची मदत

दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख, तर पंतप्रधान निधीतून प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
घातवार