
मध्य प्रदेशमध्ये दर्ग्याला भगवा रंग दिल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. ही घटना रविवारी होशंगाबाद इथल्या नर्मदापुरममध्ये घडली आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नर्मदापुरमच्या जिल्हा मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर एक 50 वर्ष जुना दर्गा आहे. सोमवारी सकाळी काही स्थानिक तरुणांना या दर्ग्याची तोडफोड झालेली आढळली.या दर्ग्याचे लाकडी दरवाजे उघडले होते. दारं शेजारील मारू नदीत फेकून देण्यात आली होती.
या दर्ग्याच्या घुमटाला, मीनार, मकबरा आणि प्रवेशद्वाराला भगवा रंग फाराण्यात आला होता. दर्ग्याच्या परिसरातली कूपनलिकाही उचकटून काढण्यात आली होती. या प्रकरानंतर राज्य महामार्ग क्रमांक 22वर रास्तारोको करण्यात आला. या मोर्चानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली. मात्र, तक्रार नोंदवल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही, अशी तक्रार स्थानिक करत आहेत.
रास्तारोको हटवण्यासाठी अधिकची पोलीस कुमक मागवण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील गर्दी पांगवून कलम 295(अ) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्रथम दर्ग्याची दुरुस्ती सुरू केली असून या प्रकरणातील आरोपींचा तपास करण्यात येत आहे.



























































