
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजपसोबत सर्वच पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली असून विविध कंपन्या-वृत्तवाहिन्या यांनी सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. एका खासगीने मध्यप्रदेशात नुकत्याच केलेल्या सर्व्हेनुसार काँग्रेस आणि बहुजन समाजवादी पक्ष (बसप) एकत्र आल्यास भाजपला काही जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी भाजप सत्ता कायम राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. २३० सदस्यांच्या विधानसभेत बहुमताचा ११६ हा गाठणे आवश्यक आहे. तामिळनाडूतील मीडिया कंपनी ‘स्पीक मीडिया नेटवर्क’ने मध्यप्रदेशात निवडणूक पूर्व सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार काँग्रेस-बसप एकत्र न आल्यास मध्यप्रदेशात भाजप पुन्हा सत्तेवर येण्यात अडचण होणार नाही. त्यांना बहुमताचा आकडा गाठता येईल. मात्र काँग्रेस-बसप एकत्र आल्यास भाजपला ३९ जागांचे नुकसान सोसावे लागेल. असे असले तरी भाजपला बहुमतापेक्षा साधारण १० जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. पण छोटी चूक झाली तरी बहुमताचा आकडा गाठणं थोडं अवघड जाऊ शकेल आणि कर्नाटकसारखी स्थिती होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-बसप एकत्र आल्यास २०१३च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ६२ जागांऐवजी १०३ जागा मिळतील अशी शक्यता वर्तविली आहे.



























































