
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका इमारतीला भीषण आग लागल्याने सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 8 जण या घटनेत जखमी झाले असून बचावकार्य सुरू आहे. आगीचं कारण समजू शकलेलं नाही.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ग्वाल्हेर येथील इंदरगंज चौकातील ही तीन मजली इमारत आहे. या इमारतीत 25 जण राहत होते. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ऑईल पेंटच्या दुकानाला आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारणं केलं. अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केलं.
या घटनेत सात जण मृत्युमुखी पडले असून त्या चार महिला आणि 3 मुलींचा समावेश आहे. या घटनेतील आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा नसल्याचीही माहिती मिळत आहे.



























































