कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी करणं भोवलं, भाजप मंत्र्याविरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंत्री विजय शहा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध लवकरात लवकर एफआयआर नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना बुधवारी संध्याकाळपर्यंत विजय शहा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. तसेच जर त्यांनी तसे केले नाही, तर त्यांना न्यायालयाचा अवमान कायद्याअंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, कर्नल सोफिया यांच्याबाबत वादग्रस्त केल्यामुळे संतप्त काँग्रेस नेते मनोज शुक्ला त्यांच्या अनेक समर्थकांसह विजय शहा यांच्या बंगल्यावर पोहोचले. त्यांनी विजय शहा यांच्या नावाच्या पाटीवर काळी शाही फासली. त्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या गेटवरही शाही फेकली. तसेच बंगल्याच्या बाहेर तिरंगाही फडकवण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह तेथे ‘विजय शहा मुर्दाबाद अशी घोषणाबाजीही केली. एवढेच नाही तर घोषणाबाजीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी त्यांचा राजीनामाही मागितला.