महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी आग, पुजाऱयासह 14 होरपळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात भस्म आरतीसाठी दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. मात्र आज धुळवडीच्या दिवशी पहाटे भस्म आरती वेळी आग भडकली. त्यात पुजाऱयासह 14 भाविक जखमी झाले. दरम्यान, आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचे विशेष महत्त्व आहे. रविवारी होळीचा सण साजरा झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास भस्म आरती सुरू होती. भाविक गुलाल उधळत होते. भस्म आरती करणारे पुजारी संजीव यांच्यावरही गुलाल उधळला. गुलालामधील रसायानामुळे आगीचा भडका उडाला असा अंदाज आहे. आगीमुळे काही काळ भाविकांमध्ये घबराहट पसरली. अग्निशमन यंत्रणेने आग तत्काळ आटोक्यात आणली. पुजारी संजीव यांच्यासह 13 भाविक जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

सूचना लिहिली असतानाही गुलाल उधळला

महाकाल मंदिराच्या गाभाऱयातील भिंतीला चांदीचा मुलामा दिलेला आहे. ‘या ठिकाणी गुलाल उधळू नये’ अशी स्पष्ट सूचना देणारा फ्लेक्स लावण्यात आला आहे. तरीही गुलाल उधळला गेला. या आगीत हा सूचना फलकही जळाला आहे.

चौकशीचे आदेश

महाकाल मंदिरातील आगीची चौकशी करण्याचे आदेश उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी दिले आहेत. यासाठी आठ जणांची चौकशी समिती नेमली आहे.

रंगांमुळे जखम शोधण्यात अडचणी 

रंग आणि गुलाल संपूर्ण अंगावर पसरल्यामुळे जखम शोधून त्यावर मलमपट्टी करणे तसेच इतर उपचार करणे अवघड झाल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले.