मध्य प्रदेश- दलित तरुणीवर बलात्कार, पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून पीडितेची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rape
प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या भयंकर सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पडसाद सध्या देशभरात उमटत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथेही एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे तिच्या वारंवार तक्रारीनंतरही पोलिसांनी चार दिवसांनी एफआयआर दाखल केल्याने निराश झालेल्या पीडितेने आत्महत्या केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 28 सप्टेंबर रोजी नरसिंहपूर येथील रिछाई गावात राहाणारी पीडिता शेतात गवत कापायला गेली होती. तेव्हा तिच्या शेजारी राहणाऱ्या तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने याबाबत पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. चार दिवस पीडिता कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्याची विनंती करत होती. अखेर पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सांगितलं. वैद्यकीय अहवाल घेऊन जेव्हा पीडिता पोलीस स्टेशनला गेली, तेव्हा तिच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनलाच बसवण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी उलट तिला शिवीगाळ करून तिच्याकडे पैसे मागितले आणि त्या बदल्या कुटुंबीयांची सुटका करण्याबाबत सांगितलं असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अखेर 9 वाजता तिच्या सासु-सासऱ्यांची सुटका करण्यात आली. पण, चार दिवस उलटूनही तक्रार दाखल न केल्याने निराश झालेल्या पीडितेने शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केली. पीडितेच्या आत्महत्येनंतर ही बातमी पसरली आणि जनक्षोभ उसळला. तो शांत करण्यासाठी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. एक अद्याप फरार आहे.

दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य पाहून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच प्रकरणाची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यालाही अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.