
सामना ऑनलाईन । चेन्नई
अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या लहान मुलांना मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. दुसरीपर्यंतच्या मुलांना गृहपाठ देऊ नका. त्यांना बालपणीचा आनंद लुटू द्या असे उच्च न्यायालयाने बजावले आहे. सीबीएसई शाळांमध्ये एनसीआरटी पुस्तकांची सक्ती करावी अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती, त्यावर सुनावणी करताना न्या.एन. किरुबाकरन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
लहान मुलं ही वेटलिफ्टर्स किंवा ओझे वाहून नेणारी कंटेनर्स नाहीत. महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारने दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी कायदा केला असून याच धर्तीवर केंद्र सरकारनेही कायदा करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने यावेळी दिले. दप्तराचे ओझे हे मुलांच्या वजनाच्या १० टक्के असावे असेही न्यायालयाने यावेळी सांगितले. मुलांना झोप घेण्याचा पुरेपूर अधिकार आहे. झोप अपुरी झाल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे निरीक्षणही न्यायालयाने व्यक्त केले आहे.
शाळा कोणतेही शिक्षण मंडळ किंवा बोर्डाशी संलग्न असल्या तरी हा नियम लागू करावा. पहिली आणि दुसरीच्या मुलांना भाषा आणि गणित शिवाय अन्य कोणताही विषय नसावा असेही न्यायालयाने स्पष्ट केले























































