मागाठाणे येथील 40 हजार झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील वन खात्याच्या जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱया तब्बल 40 हजार झोपडीधारकांना आता हक्काचे घर मिळणार आहे.

झोपडपट्टीवासीयांच्या हक्काच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे गेल्या सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत येथील झोपडीधारकांना दहा किलोमीटर परिसरात सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) घर देण्याचा निर्णय आज राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. तसेच त्यासाठी विशेष धोरण आखण्याचे निर्देश सबंधित विभागांना दिले आहेत. त्यामुळे मागाठाणे परिसरातील झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माठाणे मतदारसंघातील केतकीपाडा, धारखाडे दहिसर पूर्व, दामूनगर, भीमनगर, गौतमनगर, आंबेडकर नगर, जानूपाडा, पांडे कंपाऊंड, कांदिवली पूर्व, वैभवनगर येथे जवळपास 40 हजार झोपडीधारक वास्तव्य करत आहेत. त्यांना हक्काचे घर देण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांनी वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवला होता. त्या पार्श्वभूमीवर आज नगरविकासमंत्री एकानाथ शिंदे यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी त्यांनी झोपडपट्टीवासीयांना एसआरए योजनेत घर देण्याचा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रकाश सुर्वे यांनी दिली.

त्याबदल्यात संबंधित विकासकांना वाढीव चटई क्षेत्र देण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विकास आराखडय़ात येणाऱया 2011च्या पात्र झोपडय़ांची यादी करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश नगरविकासमंत्र्यांनी दिल्याचे सुर्वे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार प्रकाश सुर्वे, वन खात्याचे अप्पर सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, जिल्हाधिकारी शहर व उपनगर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या