
वाढत्या महागाईमुळे होरपळलेल्या सर्वसामान्यांना आपल्या आवडत्या चहा आणि मॅगीसाठी देखील आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. नेस्ले इंडिया कंपनीने मॅगीच्या किमतीत 9 ते 16 टक्क्यांनी वाढ केली असून 12 रुपयांच्या मॅगीच्या छोटय़ा पॅकेटसाठी ग्राहकांना आता 14 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय कंपनीने सोमवारपासून चहा, कॉफी, दुधाच्या किमतीत देखील वाढ केली आहे. वाढत्या महागाईमुळे उत्पादनांच्या किमतीत वाढ केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने ब्रू कॉफीच्या किमतीत 3 ते 7 टक्क्यांनी तर ब्रु गोल्ड कॉफीच्या बरणीच्या किमतीत 3 ते 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. इन्स्टंट कॉफी पाऊचदेखील 3 ते 6.66 टक्क्यांनी महागले आहे. ताजमहाल चहाची किमत 3.7 ते 5.8 टक्क्यांनी तर ब्रुक बॉण्ड चहाच्या किमती 1.5 ते 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर नेस्ले इंडियाच्या ए प्लस दुधाच्या दरात देखील वाढ केली आहे. एक लिटर दुधासाठी आता 75 रुपयांऐवजी 78 रुपये मोजावे लागणार आहेत. नेस्केफेचे 25 ग्रॅम पॅक आता 2.5 टक्क्यांनी वाढले असून 78 रुपयांऐवजी आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत.































































