शुक्रवारपासून माघी गणेशोत्सव गणपती बाप्पा मोरया, पण कोरोना खबरदारी घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत शुक्रवारपासून माघी गणेशोत्सवास प्रारंभ होत असल्याने मंडळांसह गणेशभक्तांमध्ये उत्साह वाढलेला असताना पालिकेने मात्र कोरोना खबरदारीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. शिवाय घरगुती मूर्ती 2 फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटांपर्यंत असावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईत डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेली कोरानाची तिसरी लाट आता चांगलीच आटोक्यात आली आहे. मात्र अजूनही मुंबईत सुमारे एक हजारांपर्यंत बाधित दररोज आढळत आहेत. शिवाय 10 मृत्यू होत आहेत. त्यामुळे कोरोना पूर्ण गेलेला नसल्यामुळे कोरोना खबरदारी घेणे अनिवार्य असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना गर्दी करू नये, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील सुमारे अडीच हजार मंडळे माघी गणेशोत्सव साजरा करतात. यामध्ये सोसायटय़ांतील आणि घरगुती उत्सवांचा समावेश सर्वाधिक असतो. ही सर्व मंडळे गणेशोत्सव साजरा करताना कोरोना खबरदारी घेऊन समाजोपयोगी उपक्रम साजरा करतील, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

हे नियम पाळा

  • उत्सवासाठी पालिकेची रीतसर परवानगी घेणे अनिवार्य.
  • मर्यादित आकाराचे मंडप उभारा, भपकेबाज सजावट नको.
  • शक्यतो घरातील धातूच्या मूर्तीचे पूजन करून घरच्या घरी विसर्जन करावे.
  • शाडूची मूर्ती असल्यास नजीकच्या विसर्जनस्थळी विसर्जन करावे.
  • आरती, भजन, कीर्तन असल्यास गर्दी होऊ देऊ नये. सामाजिक उपक्रमांसाठी भर द्यावा.
  • मंडपाचे दिवसातून तीन वेळा सॅनिटायझेशन. शक्यतो ऑनलाइन दर्शनाला प्राधान्य.
  • फुले अर्पण करणे, प्रसाद वाटणे आदींना आळा घालावा.
  • मूर्ती आगमन किंवा विसर्जनाची मिरवणूक काढू नये.
  • सील इमारतीमधील मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणू नये.