महाजनादेश यात्रा भिगवणमध्ये

2971

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा भिगवणमध्ये शनिवारी येणार असून याठिकाणी तालुका भाजपच्यावतीने त्याची जय्यत तयारी चालू आहे.  या यात्रेत दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसशी फारकत घेवून हातात कमळ घेतले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या प्रवेशद्वारात या यात्रेचे जोरदार स्वागत होणार असून त्यानिमित्ताने हर्षवर्धन पाटील यांनादेखील जोरदार प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.

या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मारुतराव वणवे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक वणवे,माऊली चवरे,तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे,ज्ञानेश्वर  मारकड,तेजस देवकाते,ॲड. कृष्णाजी यादव,विलास वाघमोडे,अशोक शिंदे,संपत बंडगर ,यशवंत वाघ ,बाळासाहेब पानसरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वासुदेव काळे यांच्या हस्ते कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

काळे पुढे म्हणाले, महाजनादेश यात्रेद्वारे राज्यातील विविध भागांत जनतेशी संपर्क साधून केंद्र व राज्य शासनाच्या कामगिरीची व लोकोपयोगी कामे केल्याचे सांगितले जात आहे. तसेच स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात अनेक न भूतो न भविष्यती कामे सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू  मानून  झाली असून हे सर्वसामान्य माणसांपर्यंत यात्रेच्या माध्यमातून पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे काळे यांनी सांगितले.त्याचप्रमाणे इंदापूरच्या आगामी राजकीय परिस्थितीसाठी ही यात्रा महत्वपूर्ण ठरणार असून हा आगामी निवडणूकीसाठी ट्रेलर राहणार आहे.  यासाठी सर्वांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सरचिटणीस सुरजीतसिन्ह ठाकूर,राज्य मंत्री बाळा भेगडे,हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

महाजनादेश यात्रेचा मार्ग 

तिसऱ्या टप्प्यात महाजादेश यात्रा नगरमधून काष्टी मार्गे  दौंड व नंतर पुणे सोलापूर महामार्गावरील  कुरकुंभ व नंतर भिगवण येथे स्वागत सभा व त्यानंतर बारामती येथे स्वागत सभा व बारामतीहून उंडवडी मार्गे पाटस व नंतर वरवंड येथे जाहीर सभेचे दुपारी 2.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते सामील होणार आहे.

मदनवाडी चौफुला येथे होणार स्वागत सभा. 

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून प्रथमच देवेंद्र फडणवीस भिगवणमध्ये येत आहे यामुळे त्यांचेयाठिकाणी  भव्य स्वागत होणार आहे. मदनवाडी चौफुला याठिकाणी साडेबारा वाजता स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस  कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मदनवाडी चौफुला याठिकाणी मोठ्याप्रमाणावर साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या