
काही जणांची येथे मक्तेदारी होती, पण त्यांच्या एकाधिकारशाहीला घाबरण्याचे कारण नाही. अरेला का रे करण्याची ताकद महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये आहे, अशी जोरदार फटकेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात भव्य मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण तसेच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात अजित पवार यांनी भाजपचे नाव न घेता जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, वेगवेगळी विचारधारा असणारे तीन पक्ष एकत्र आले असले तरी आमची भूमिका एकच आहे. सीएए आणि एनआरसी लागू झाल्यामुळे देशात अनेक प्रश्न निर्माण झाले, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर ठाम भूमिका घेत महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही असे सांगितले आहे. आगामी अर्थसंकल्पात शिवभोजन थाळीला मोठय़ा प्रमाणात निधी देण्याचा विचार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. यापुढे नवी मुंबई महापालिकेत अनेक जण महापौर, स्थायी समितीचे सभापती होतील, पण नाईक होणार नाही, असा टोलादेखील त्यांनी गणेश नाईक यांना लगावला.
दलबदलूंना नवी मुंबईकर धडा शिकवतील – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नवी मुंबई पालिकेची पहिल्यांदाच निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विजयाचा झेंडा फडकवेल, असा विश्वास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱयांना नवी मुंबईकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही त्यांनी दिला.
सरकार पाच वर्षे टिकेल – अशोक चव्हाण
इतकी वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र होती, पण आमच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो असेल असे कधीच वाटले नव्हते. कोणी कितीही वावडय़ा उठवल्या तरी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजप सरकारने केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीची मागणीदेखील त्यांनी केली.































































