मंत्री तानाजी सावंतांचा डाव उधळला! परंडा बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता

परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी जंग जंग पछाडलेल्या मंत्री तानाजी सावंताची मिजास महाविकास आघाडीने उतरवली. बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जयकुमार जैन तर उपसभापतीपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली.  बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मतदारांनी लाथाडूनही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी तानाजी सावंत यांनी बगलबच्च्यांकरवी हाताशी धरून  महाविकास आघाडीच्या आठ संचालकांचे अपहरण घडवले होते. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांनी सूत्र फिरवताच अपहरण करण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांना मिरजमध्ये सोडून देण्यात आले. याप्रकरणी 35 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आणि पाच जणांना अटकही करण्यात आली होती.