
गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने महाबळेश्वरच्या पश्चिम पट्टय़ात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामध्ये मकरंद गडाच्या पायथ्याशी असणारे हातलोट गाव आजही त्याच्या यातना भोगत आहे. जीवनावश्यक असणाऱया पाणी स्रोताची विहीर बुजून गेली. शेतात जाणारा ओढय़ावरील पूल पुराने वाहून गेला. शेती तर भुईसपाट झाली असून, आता पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे. अतिवृष्टीमुळे झळ बसलेल्या हातलोटकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे आजही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आता शेतीच नसल्याने नक्की काय करायचे, असा प्रश्न हातलोट ग्रामस्थांच्या समोर उभा आहे.
हातलोट हे महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य मकरंद गडाच्या वातावरणात पायथ्याशी वसलेले आणि सातारा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सरहद्दीवर तीनशे ते चारशे लोकवस्तीचे गाव आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे गावची पाण्याची विहीर, शेतात जाण्याकरिता असणारा ओढय़ावरील पूल तसेच डोंगरउतारावरून आलेला राडारोडा अन् पाण्याच्या प्रवाहाने पूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीला दहा महिने पूर्ण झाले असून, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आजही ‘जैसे थे’ आहे. काही ठिकाणी शेतांच्या किरकोळ दुरुस्त्या झाल्या. मात्र, हातलोटवासीयांकडे अजून कोणतीच सुविधा पोहोचली नाही.
चोहोबाजूंनी वेढलेल्या जंगलाच्या कुशीत हातलोट गाव वसले आहे. चारी दिशांना जंगल उतार आहे. गावच्या पाणवठय़ाची विहीर अतिवृष्टीमुळे आलेल्या राडय़ारोडय़ाने बुजली आहे. त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. विहिरीतील गाळ काढून तेच पाणी गावकरी सध्या पिण्यासाठी वापरत आहेत. पूल वाहून गेल्याने पावसाळ्यात रानात जाण्याची अडचण होणार आहे. अतिवृष्टीत हातलोट गावाकडे जाणाऱया रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. पुन्हा पावसाळा सुरू होताच वाहतूक व्यवस्था कोलमडून पडणार आहे. अनेक ठिकाणी वाहून गेलेल्या मोऱया पूल दुरुस्त केले गेले नाहीत. फक्त रस्त्यावरील राडारोडा दूर करून वाहतूक सुरू केली आहे. पावसाळ्यात ती पुन्हा बंद पडण्याची शक्यता आहे.
22 जुलैच्या अतिवृष्टीस आजमितीस दहा महिने उलटून गेले आहेत. आजही आम्ही त्याच परिस्थितीत आहोत. आमच्याकडे कोणतीही प्रशासकीय यंत्रणा पोहोचली नाही. आज आम्ही ग्रामस्थ अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या यातना भोगत आहोत. आमच्या गावात येणारी एसटी बंद आहे. विद्यार्थ्यांना 25 ते 30 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व दुरुस्त्या होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे.
– शशिकांत मोरे, सरपंच, हातलोट, ता. महाबळेश्वर.


























































