
महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी आता डहाणूच्या कृषीनगरीत बहरली आहे. आसनगाव येथील कृषी तंत्र विद्यालयाने प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरीच्या एक हजार रोपांची लागवड केली होती. ही लागवड यशस्वी झाल्यामुळे डहाणूतील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग सापडला आहे. जव्हार, मोखाडा तालुक्यासह डहाणू तालुक्यातील शेतकरी आता या पिकाकडे वळले आहेत. डहाणूत पिकवण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीला ३०० रुपये किलो असा दर मिळत आहे.
महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असले तरीही आता पालघर जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीची लागवड होऊ लागली आहे. या फळांना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह स्थानिक बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. पालघर जिल्ह्यातील वाणगाव, डहाणू, बोईसर तसेच ग्रामीण भागातही चांगली विक्री होत आहे. अधिक उत्पादनासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात स्ट्रॉबेरीची लागवड करावी. लागवड उशिरा झाल्यास फळधारणेलाही उशीर होतो. सध्या स्ट्रॉबेरीला २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. एका झाडाला साधारणपणे ७०० ते ८०० ग्रॅम फळे लागतात.
आधुनिक शेतीचे ज्ञान उपलब्ध झाल्यामुळे नोकरीपेक्षा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रबळ झाला आहे. स्ट्रॉबेरी पिकासाठी जिल्ह्यातील हवामान पोषक असल्याने स्ट्रॉबेरी पिकाचे तंत्रज्ञान स्वतःच्या शेतीमध्ये वापरून गावखेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया कृषी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी नीलम पडवळे हिने व्यक्त केली आहे.


























































