
रुग्णांची फरफट कराल तर रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाड ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला दिला आहे. ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस व इतर औषधांचा साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असून उपचारासाठी त्यांना ३० किलोमीटर प्रवास करत माणगाव उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागत आहे. केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची फरफट होत असल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कुर्ला गायकरवाडी येथे शुक्रवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने ग्रामस्थांचे लचके तोडले. या हल्ल्यात धोंडू तांबडे, सनी खेडेकर, मालती पवार व अन्य एक असे एकूण चार जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर महाड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या घटनेनंतर शिवसेना उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यांची चौकशी केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी थेट महाड ग्रामीण रुग्णालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालयातील सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कुलूप भेट दिले. लवकरच रुग्णालयातील सर्व सुविधा सुरळीत सुरू न झाल्यास हेच टाळे ठोकून रुग्णालय बंद करू, असा इशारा यावेळी त्यांनी प्रशासनाला दिला.
प्रशासनाचे सेवांकडे दुर्लक्ष
प्रशासनाकडून फक्त रुग्णालयाची इमारत उभारण्यासाठी भर दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकारी, औषधसाठा व महाड ट्रॉमा केअरमधील अनेक पदे रिक्त असून या सेवांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचा आरोप सोमनाथ ओझर्डे यांनी केला. त्यामुळे शासनाने तातडीने रिक्त पदांवर नियुक्त्या कराव्या व औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.