अख्ख्या तळीये गावाचे स्मशान झाले… महाड-पोलादपूरवर मृत्यूची दरड कोसळली, 49 ठार

कोकणात पावसाने हाहाकार माजवला असतानाच महाड-पोलादपूर तालुक्यावर मृत्यूची दरड कोसळली. या भयंकर दुर्घटनेत 49 जण जागीच ठार झाले. महाडमध्ये डोंगराच्या कुशीत वसलेल्या तळीये गावाचे तर स्मशान झाले. दरडींखाली चिरडून 38 गावकऱयांचा मृत्यू झाला. पोलादपूरमधील केवनाळे व गोवेले सुतारवाडीमध्येही घरांवर दरड कोसळून 11 रहिवाशांचा बळी गेला. कुणाची आई, बहीण, मुलगा तर कुणाचे वडील या महाकाय दरडींनी गिळंकृत केले. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि अनेकांचे संसार या दरडींखाली कायमचे गाडले गेले.

घरात कोणीच वाचले नसल्याने सांत्वन तरी कोण कोणाचे करणार अशीच काळजाचा थरकाप उडवणारी परिस्थिती होती. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती असून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, सायंकाळनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने संपूर्ण रायगड जिह्यात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

महाडपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर तळीये हे गाव असून गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास लगतच्या डोंगरावरील दरड 32 घरांवर कोसळली.

या गावापर्यंत येणारे सर्वच रस्ते मुसळधार पाऊस, पूर यामुळे बंद होते. वरंध घाटात देखील दरड कोसळल्याने  रस्ता ठप्प होता. त्यामुळे तळीये गावात मदत पाहोचण्यास उशीर झाला.

दरड कोसळल्याची बातमी रात्री 9 च्या सुमारास समजली. पण नेटवर्कही बंद असल्याने कोणाशीच संपर्क साधता येत नव्हता. दरडींखाली दबलेली घरे… कोसळणारा पाऊस आणि त्याखाली गाडले गेलेले ग्रामस्थ अशी भयाण स्थिती होती.

दरड कोसळण्याचा प्रचंड आवाज येताच एका घरातील दोन महिला जीवाच्या आकांताने बाहेर पळाल्याने बचावल्या असल्याची माहिती बाजूच्या वाडय़ांमधील ग्रामस्थांनी दिली.

पोलादपूर तालुक्यातील गोवेले सुतारवाडी येथे दरड कोसळून पाच जणांचा तर  केवनाळे येथे 6 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. तेथे ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

एनडीआरएफच्या माध्यमातून बचावकार्याला वेग

– एनडीआरएफच्या एकूण 14  तुकडय़ा नेमून दिलेल्या जिह्यांत पोहचल्या असून त्यांची जिल्हानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे ः पालघर 1, ठाणे 2, रायगड 2, रत्नागिरी 4, सिंधुदुर्ग 1, सांगली 1, सातारा 1, कोल्हापूर 2, एनडीआरएफच्या नागपूरसाठी 2 आणि या रायगड जिह्यासाठी  2 अशा 4  तुकडय़ा बचाव कार्य करीत आहेत.

– पोलादपूरकरिता एनडीआरएफची 1 टीम मुंबई येथून हवाईमार्गे पाठविण्यात आली.

– तटरक्षक दलाच्या 2, नौदलाच्या 2  तुकडय़ा रत्नागिरी येथे बचाव कार्य करीत आहेत.

– राखीव तुकडय़ा अंधेरी येथे– 2, नागपूर येथे 1, पुणे येथे 1, एनडीआरएफ धुळे येथे 1 आणि नागपूर येथे 1 अशा तैनात करण्यात आल्या आहेत.

– एनडीआरएफच्या 8  अतिरिक्त तुकडय़ा भुवनेश्वर येथून येत आहेत.

– महाड माणगांव येथे 2000 लोकांची निवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तांना अन्न व कपडे गरजेनुसार पुरविण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या