अखेर वीज कामगारांच्या बोनसचं घोडं गंगेत न्हाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील वीज कामगारांच्या दिवाळी बोनसचं घोडं अखेर गंगेत न्हाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांची कपात करत सुमारे 12 हजार रुपये बोनस येत्या पगारासोबत देण्यात येणार आहे.

कोरोना महामारीमुळे वीज कंपन्या आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने व्यवस्थापनाने चालू वर्षी कर्मचाऱयांना दिवाळी बोनस देण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे वीज कामगारांच्या 25 संघटनांनी एकत्र येत लक्ष्मी पूजनादिवशी एक दिवसाचा संप करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अखेरच्या क्षणी मध्यस्थी करत वीज कामगारांना बोनस दिला जाईल असे स्पष्ट केले होते. तसेच बोनसची रक्कम लवकरच जाहीर केली जाईल असेही सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी ऊर्जामंत्री, तिन्ही वीज कंपन्यांचे अधिकारी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे बैठक झाली. यावेळी मागील वर्षी नियमित कर्मचाऱयांना 15 हजार 500 रुपये तर उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यकांना 9 हजार रुपये बोनस दिला होता. त्यामध्ये 20 टक्क्यांची कपात करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे नियमित कामगारांना सुमारे बारा हजार तर इतरांना सात हजार रुपये एवढा बोनस मिळणार आहे.