
#MahaElection विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी वापरावयाच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन आणि निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात येणार्या अधिकारी व कर्मचारी यांची द्वितीय सरमिसळ (सेकंड रॅन्डमायजेशन) दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) येथे होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी, बाराही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक, मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची प्रशासकीय पातळीवरील तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूकीच्या अनुषंगिक बाबींसंदर्भात भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाही केली जात आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची द्वितीय सरमिसळ हा या प्रक्रियेचाच एक भाग आहे. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी प्रथम सरमिसळ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
जिल्ह्यात 21 ऑक्टोबर रोजी बारा विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 216-अकोले हा अनुसूचित जमातीसाठी तर 220-श्रीरामपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. उर्वरित 217-संगमनेर, 218-शिर्डी (राहता), 219-कोपरगाव, 221-नेवासा, 222-शेवगाव, 223-राहुरी, 224-पारनेर, 225-अहमदनगर शहर, 226-श्रीगोंदा आणि 227-कर्जत-जामखेड हे मतदारसंघ अराखीव आहेत. या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई असे एकूण पाच कर्मचारी लागणार आहेत. बारा मतदारसंघात एकूण 3 हजार 722 मतदान केंद्रे आहेत. या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील आठ मान्यताप्राप्त पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.






























































