Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा

बिहार विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून महाआघाडीमध्ये पेच निर्माण झाला होता. एवढेच नाही तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही निश्चित झाला नव्हता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी की राष्ट्रीय जनता दलचे नेते, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढायची यावरून चर्चा सुरू होती. मात्र गुरुवारी हा प्रश्नही महाआघाडीने मार्गी लावला. पाटण्यातील हॉटेल मौर्य येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा, तर व्हीआयपीचे नेते मुकेश साहनी हे उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असतील अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी केली.

मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करताना अशोक गहलोत म्हणाले की, सर्वंचे मत जाणून घेतल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की तेजस्वी यादव हे या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, तर मुकेश साहनी हे उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरीत असतील.

देशातील सध्याची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. देश कोणत्या दिशेने जातोय हे कुणालाही माहिती नाही. बेरोजगारी वाढली आहे. अशा स्थितीत देशासाठी योग्य असलेल्या गोष्टींची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. शेतकरी, कामगार, सर्वसामान्य लोक, विद्यार्थी आणि तरुणांसाठी परिस्थिती सारखीच आहे. अशा स्थितीत लोकांना बदल हवा असतो आणि यावेळीही बदल होईल, असेही गहलोत म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद यादव, सोनिया गांधी, राहुल गांझधी, प्रियांका गांधींसह महाआघाडीतील सर्वच घटकपक्षातील नेत्यांचे आभार मानले आणि आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असे म्हणाले. यावेळी त्यांनी एनडीएवरही निशाणा साधला. हे लोक थकले असून फकत् सत्तेचे भुकेले आहेत, अशी टीका त्यांनी केली.