महानंदचा डोलारा चालतोय ‘ओव्हर ड्राफ्ट’वर, सरकारी धोरणाचा परिणाम

553

राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था असलेल्या महानंदचा डोलारा सध्या ओव्हर ड्राफ्टवर चालत असल्याचे समोर आले आहे. शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या जाणार्‍या प्रतिलिटर दुधाला 25 रुपये दर देणे सरकारने वर्षभरापूर्वी सक्तीचे केले आहे. डेअरीवर त्याचा आर्थिक भार पडल्याने दूध खरेदी, कर्मचार्‍यांचे पगार आणि इतर खर्च भागवण्यासाठी डेअरीला वर्षभरात 24 कोटी 50 लाखांचा ओव्हर ड्राफ्ट काढण्याची नामुष्की ओढावली आहे.

शेतकर्‍यांच्या दुधाला चांगला दर देण्यासाठी राज्य सरकारने जूनजुलै 2018 पासून प्रतिलिटरचा दर 25 रुपये एवढा निश्चित केला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकार दूध पावडर उत्पादकांना प्रतिलिटरला तीन रुपये अनुदान जाहीर केले होते. बाजारात मुबलक दूध असल्याने इतर खासगी दूध संघ 20-22 रुपये एवढ्या कमी दराने दुधाची खरेदी करत, मात्र महानंदने सरकारच्या निर्णयानुसार 25 रुपये दर दिल्याने डेअरीला लिटरमागे सुमारे तीनचार रुपये नुकसान सहन करावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर डेअरीने तीन रुपये अनुदान देण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यास सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र अद्याप अनुदान दिलेले नाही. त्यामुळे डेअरीला सर्व खर्च भागवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे डेअरीने त्यांच्या 100 कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिटच्या बदल्यात 24 कोटी 50 लाख रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट काढल्याचे डेअरीचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी सांगितले.

सरकारने अनुदान द्यावे

कर्नाटक सरकार नंदिनी डेअरीला प्रतिलिटर दुधाच्या खरेदीवर सहा रुपये अनुदान देते. त्यानुसार राज्य सरकारने महानंदला प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी डी. के. पवार यांनी केली आहे. दरम्यान, शेजारील राज्यातील दूध संघांना तेथील सरकार अनुदान देत असल्याने त्यांचा विक्री दर कमी असल्याने त्यांच्याशी स्पर्धा करणे कठीण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या