अविश्वास ठरावाच्या भीतीने महानंदच्या अध्यक्षांचा राजीनामा

357

राज्यातील दूध संघांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर आपल्याविरोधात अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो या भीतीने त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुढील चौदा दिवसांत नव्या अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे.

महानंद डेअरीचे राज्यात सुमारे 87 जिल्हा आणि तालुका सहकारी दूध संघ सभासद आहेत. ते आपल्यामधून 21 जणांची संचालक म्हणून निवड करतात. 2015 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बहुमत असतानाही तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी व डेअरीच्या संचालक मंदाकिनी खडसे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खडसे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली संचालकांकडून सुरू झाल्या होत्या. तत्पूर्वीच मंदाकिनी खडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा व्यवस्थापकीय संचालकांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताबदलानंतर आता महानंदमध्येही सत्ताबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक प्राधिकरणाकडे राजीनामा

मंदाकिनी खडसे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुढील चौदा दिवसांत नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सदर राजीनामा सहकार खात्याच्या निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्याकडे पाठवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या