महानंदच्या दुधाला मिळणार आयएसओ मानांकन

336

महानंद डेअरीचे दूध सकस आणि उच्च प्रतीचे आहे. त्यावर आता आएएसओचे शिक्कामोर्तब होणार आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि पोषकत्वाची तपासणी करून टीयूव्ही-एसयूडी या संस्थेकडून ‘आयएसओ 22000’ मानांकन दिले जाते. त्यानुसार महानंद डेअरीची उत्पादने, प्लाण्टची तपासणी संबंधित संस्थेने केली असून लवकरच  मानांकन मिळणार आहे.

राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून महानंद डेअरी काम करत आहे. त्यांच्याकडून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातील मोठय़ा शहरांमध्ये दुधाचे वितरण केले जाते. तसेच दही, ताक, लस्सी, मसाला दूध, तुपाची विक्री केली जाते. हे सर्व पदार्थ उच्च प्रतीचे असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यानंतर डेअरीने आता आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कंबर कसली असून नुकतीच टीयूव्ही-एसयूडी संस्थेने तपासणी केली आहे. त्यामध्ये सर्व उत्पादने उत्कृष्ट ठरली असून पॅकिंग प्लाण्ट आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्याचे आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर डेअरीला आयएसओ प्रमाणपत्र मिळणार असल्याचे निश्चित झाले असल्याची माहिती डेअरीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दुधाच्या गुणवत्तेत तडजोड नाही

महानंद दररोज सुमारे अडीच लाख लिटर गाईच्या दुधाचे वितरण करते. त्यामध्ये 3.5 स्निग्धांश आणि 8.5 एवढे घनघटकाचे प्रमाण असते.  तर दही, ताक, लस्सी, मसाला दूध या सह उत्पादनांसाठी म्हशीचे उत्तम दर्जाचे दूध वापरले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या