
अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा जीआर जारी केल्यानंतर शुक्रवारी शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले आहे. उद्या 14 ऑगस्टपासून राज्यभरात अकरावी प्रवेशाला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीची ऑनलाइन नोंदणी करण्याबरोबरच अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. तसेच अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोटय़ातील जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रियादेखील उद्यापासूनच सुरू होणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी दिली.
शिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे तात्पुरते वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दुसरी फेरी, 5 ते 11 सप्टेंबर तिसरी फेरी आणि 12 ते 17 सप्टेंबरदरम्यान पुढील फेरी होणार आहे. तसेच
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता महाविद्यालयांनी प्रवेश फी डिजिटल स्वरूपात स्वीकारावी, अशा सूचनाही जगताप यांनी दिल्या आहेत. तसेच पुढील प्रवेशप्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- https://11thadmission.org.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येईल.
- अधिक माहितीसाठी [email protected] या ईमेलवरदेखील विद्यार्थी संपर्क साधू शकतात.
प्रवेशाच्या वेबसाइटवर मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सोयदेखील करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संचालकांनी दिली.
असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक
- 14 ते 22 ऑगस्ट – ऑनलाइन नोंदणी, ऑप्लिकेशन अर्ज भरणे, कोटा प्रवेश.
- 17 ते 22 ऑगस्ट – उपलब्ध जागांचा तपशील जाहीर होणार. अर्जाचा भाग 2 भरण्यास सुरुवात. पहिली यादी जाहीर होणार.
- 23 ते 24 ऑगस्ट – सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार.
- 27 ऑगस्ट – कट ऑफ जाहीर.
- 27 ते 30 ऑगस्ट – प्रवेश कन्फर्म करणे, रद्द करणे.
- 30 ऑगस्ट – झालेल्या प्रवेशांची माहिती आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर.
यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून संभाजीनगरला वगळले आहे. त्यामुळे या विभागातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, असे सिस्कॉम संघटनेच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी सांगितले.






























































