परभणी, सांगली, सातारामधील शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 136 कोटींची मदत

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परभणी, सांगली व सातारा जिह्यांत 1 लाख 55 हजार 318 हेक्टर जमिनीवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने आज गुरुवारी सुमारे 136 कोटी 3 लाख 99 हजार रुपयांची मदत जाहीर केली. यामुळे किमान अडीच लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 29 जिह्यांतील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग पिकांचे नुकसान झाले. तर भाजीपाला, फळे, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला. शेतीच्या नुकसानीमुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनाम्याच्या अहवालानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना 73 कोटी 54 लाख 3 हजार मदत जाहीर केली होती. त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी तसेच पुणे विभागातील सातारा, सांगली जिह्यांतील शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना 136 कोटी 3 लाख 99 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

परभणी जिह्यात जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान 2 लाख 38 हजार 530 शेतकरी बाधित झाले असून 1 लाख 51 हजार 222 हेक्टर जमिनीवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी 128 कोटी 55 लाख 38 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. सातारा जिह्यात 142 शेतकऱ्यांची 21.60 हेक्टर जमीन बाधित झाली असून त्यासाठी 3 लाख 23 हजारांची मदत देण्यात येणार आहे. तसेच सांगली जिह्यातील 13 हजार 475 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.