
भाजप मुख्यालयात तीन दिवस बैठका होणार
भाजपच्या तीन दिवसांच्या बैठकीला आजपासून सुरुवात झाली. भाजपचे 105 आमदार निवडून आल्यावरही सत्ता स्थापन करता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस हे आजच्या राजकीय सद्यस्थितीवर आमदारांशी संवाद साधणार आहेत.
दादर पूर्व येथील मुंबई भाजपच्या मुख्यालयात तीन दिवसांच्या बैठकीला आजपासून सुरुवात झाली. 105 आमदार निवडून आल्यानंतरही भाजपने राज्यात सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर सर्व आमदारांची प्रथमच एकत्रित बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदारांना मार्गदर्शन करतील. या बैठकीला सायंकाळी सुरुवात झाली. त्यापूर्वी आमदार आशीष शेलार यांनी पत्रकारांना बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील आजची राजकीय सद्यस्थिती या विषयावर आमदारांशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधतील. त्याशिवाय राज्यात अतिवृष्टी व शेतकऱयांचे झालेले नुकसान यावर चर्चा होईल. ज्या शेतकऱयांचे नुकसान झाले आहे त्या विषयावर सर्व आमदारांशी चर्चा होईल. तसेच भाजपचा अंतर्गत संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे त्यावरही चर्चा होईल अशी माहितीही त्यांनी दिली. या बैठकीला सहयोगी पक्षाचे आमदार उपस्थित आहेत. ज्या अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपला समर्थन दिले ते आमदारही या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती शेलार यांनी पत्रकारांना दिली.

























































