भाजपने आम्हाला फसवलं; महादेव जानकर यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mahadev-jankar

#MahaElection 2019 ‘मी भाजपच्या चिन्हावर बिलकूल लढणार नाही. भाजपाने रासपसोबत अन्याय केला, आम्हाला फसवलं’, असा गंभीर आरोप रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व पशुपालन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. जिंतूर आणि दौंड ही जागा महायुतीमध्ये रासपला सोडण्यात आलेली असताना भाजपाने उमेदवारांना एबी फॉर्म देऊन कमळ चिन्हावर लढण्यास भाग पाडले. यावर नाराज होऊन त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते असे म्हणाले आहेत. जिंतूर आणि दौंड या जागांवरून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांची पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

जागावाटपाचं बोलणं झालं होतं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. पण, सरळसरळ फसवलं आहे. भाजपाने मला फसवलं. माझ्या पक्षाला धोका दिला असे ते म्हणाले. मात्र असे असले तरी आता वेळ निघून गेली आहे त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना-भाजपासोबत कायम राहणार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं की, मित्रपक्षांना भाजपाने जागा दाखविली’, हे विधान योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तर गंगाखेडच्या एकमेव जागी रासपचा उमेदवार निवडणूक लढविणार आहे,’ अशी माहितीही जानकर यांनी दिली आहे.

‘गंगाखेडच्या जागेसाठी महायुतीने सहकार्य करावं, मी इतर जागी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे. राहुल कुल, मेघना बोर्डीकर यांचा रासपशी काहीही संबंध नाही, रत्नाकर गुट्टे गंगाखेडमधून एकमेव अधिकृत रासपाचा उमेदवार आहे. माझी अवस्था इकडं आड अन् तिकडं विहीर आहे, अशी झाली आहे असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष जोरात प्रचाराला लागले आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता 24 ऑक्टोबर रोजी कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.