मोदी यांच्या रणनीतीमुळे पाकची जगासमोर याचना

818

मुंबईला हादरवून ठेवणारा कुविख्यात दाऊद इब्राहिम आज लपण्यासाठी दारोदार फिरत आहे तर त्याला आश्रय देणारा पाकिस्तान पुऱया दुनियेसमोर याचना करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे दाऊद व पाकवर ही वेळ आली, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केले.

योगी आदित्यनाथ यांची मुंबईत काळबादेवीमध्ये प्रचारसभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. आपण याआधी मोदी यांच्या विकास आणि सुशासनावर पुन्हा मोहोर उमटवली. त्यांना पुन्हा सत्तेवर येण्याची संधी दिली. पहिल्यांदा देशातले राजकारण जातीयवाद, प्रांतवादावर केले जात होते. परंतु मोदी यांनी राजकारणाची दिशा बदलली. त्यांनी विकास आणि प्रशासनावर आधारित राजकारण केले. मोदींच्या नेतृत्वाखाली एक दिवस हिंदुस्थान नक्कीच विश्वशक्ती होईल. राष्ट्रवादाची मोहीम एका वेगळ्या उंचीवर नेली. या मोहिमेला सर्वांनी साथ द्यावी. मागच्या पाच वर्षांत नक्षलवाद, दहशतवाद संपताना दिसत आहे. अशा कणखर शिवसेना भाजपच्या महायुतीला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

370 हटवून दहशतवाद्यांच्या तंबूत अंतिम प्रहार

पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-कश्मीरच्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा साहसी निर्णय घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जम्मू-काश्मीरमधल्या 370व्या कलमाला विरोध केला होता. पण हे कलम हटवण्यासाठी 70 वर्षांचा कालावधी लोटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे 370वे कलम हटवून दहशतवाद्यांच्या तंबूत अंतिम प्रहार केला आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या