सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारचा पहिला पेपर

700

राज्य विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, हे अधिवेशन एक आठवडा चालणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा पहिला पेपर असणार आहे. याबाबत सर्वांनाच कुतूहल आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला न्याय मिळेल अशी आशा आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुंबईत दोन दिवसांचे अधिवेशन झाले होते. त्यात विश्वासदर्शक ठराव, राज्यपालांचे अभिभाषण व अध्यक्षांची निवड असे कामकाज झाले. नागपूर हिवाळी अधिवेशन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला पेपर आहे.

या अधिवेशनात प्रश्नोत्तरे होणार नाहीत. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्या, शासकीय व अशासकीय विधेयकांवर चर्चा होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा ठरावही या अधिवेशनात येणार आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी मागील सरकारने केलेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली होती. ती श्वेतपत्रिका या अधिवेशनात येणार का याबाबत उत्सुकता आहे.

शेतकऱयांच्या अपेक्षा पूर्ण होणार
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुमारे एक कोटीपेक्षा अधिक शेतकऱयांना याचा फटका बसला असून, 94 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे काळजीवाहू सरकार असताना या आपत्तीसाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची केवळ घोषणा केली होती. नंतर राष्ट्रपती राजवट असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही मदतीची घोषणा केली होती. त्यावर टीका झाली होती. त्यामुळे अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या बळीराजाला हे सरकार न्याय देईल, अशी आशा आहे.

विधान परिषदेचा विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार?
राज्यात सत्तांतर होऊन आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते भाजपकडे आले आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार याबद्दल कुतूहल आहे. विधानपरिषदेत भाजपचे 22 सदस्य आहेत. पूर्वी चंद्रकांत पाटील विधानपरिषदेत भाजपचे गटनेते होते. ते आता विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचे हा पेच भाजपपुढे आहे. या पदासाठी ज्येष्ठ सदस्य भाई गिरकर, विदर्भातील डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर यांची नावे चर्चेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज नागपुरात जंगी स्वागत होणार
मुख्यमंत्री या नात्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवार 15 डिसेंबर रोजी प्रथमच नागपुरात आगमन होणार आहे. विमानतळावर महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले जाणार असून सोमवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात शिवसेनेच्या जंगी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, दुपारी 2 वा मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन होणार आहे. येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांतर्फे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. या सत्कार समारंभाला शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार तसेच सहकारी पक्षांचेही नेते उपस्थित राहतील. सोमवार, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे विदर्भात शिवसेनेच्या विस्ताराचा शंखनाद करतील.

खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष!
भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वावर थेट टीका करत बंडाचे निशाण उभारले आहे. मागच्या आठवडय़ात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तसेच शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क व्यक्त केले जात आहेत. त्यातच स्वतः खडसे यांनी परळी येथील गोपीनाथगडावरील कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे भाजप सोडणार नसल्या तरी आपला भरवसा नसल्याचे सूचक विधान केले. त्यामुळे नागपूर अधिवेशनाच्या काळात ते भाजपाला धक्का देणार अशी जोरदार चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या