महाराष्ट्रविरोधी घोषणा दिल्या, मराठी पाट्याही फोडल्या; बेळगावात कन्नडीगांचा धुडगूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकबांधव आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गोळ्या घालण्याचे माथेफिरू वक्तव्य करणारा ‘कनसे’चा भुरटा नेता भीमाशंकर पाटील आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकणाऱया कन्नडीगांचा शनिवारी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेण्यात आला. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखाचे बेळगावसह सीमा भागात मराठी बांधवांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. मात्र, यामुळे मूठभर कन्नडीगांचा पोटसूळ उठला आणि बेळगावात मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी फलकांवर दगडफेक करीत धुडगूस घातला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली असून, तणाव वाढला आहे. दरम्यान, सीमाभागातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवर परिणाम होण्याच्या शक्यतेने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांना दिलासा दिला. कर्नाटकात जबरदस्तीने घुसडण्यात आलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले होते. त्यामुळे कन्नडीगांना पोटसूळ उठला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेचा तथाकथित भुरटा नेता भीमाशंकर पाटीलने मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. सीमा लढय़ातील ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यापासून कोल्हापुरातील शिवसैनिकांनीही त्याचा चांगलाच समाचार घेतला होता. शनिवारच्या दैनिक ‘सामना’मधील अग्रलेखामुळे या भीमाशंकरची बोलतीच बंद झाली. प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न केला. जाहीरपणे पुतळा दहन करण्याऐवजी पळपुटेपणा दाखवत पुतळा दहनाचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला. दरम्यान, त्यामुळे मराठी भाषिक सीमाबांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मराठी दुकानांवर दगडफेक आणि पोलिसांचा बोटचेपेपणा

कराड व इस्लामपूर येथील तिघा युवकांनी 1 वर्षापूर्वी बेळगावात केशर अमृततुल्य चहाची मुहूर्तमेढ रोवली. मराठी भाषिक असलेल्या बेळगावमध्ये केशर अमृततुल्यच्या पाच शाखा आहेत. सर्व शाखांचे नामफलक मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिलेले आहेत. परंतु मराठीचा द्वेष असल्याने कन्नड रक्षक वेदिकाच्या माथेफिरूंनी शुक्रवारी रात्री भ्याड हल्ला करून नामफलकाची तोडफोड केली. तसेच आणखी काही मराठी पाटय़ाही फोडल्या. शनिवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दाखल केली आहे, परंतु कर्नाटक पोलिसांनी या मराठी भाषिक दुकान मालकांनाच उपदेशाचे डोस पाजत नामफलकावरील कन्नड अक्षरांचा फॉन्ट मराठीपेक्षा मोठा करा. तसेच दुकानात चहासंदर्भात जो मजकूर लिहिण्यात आलेला आहे तो कन्नडमध्ये लिहा असा अजब सल्ला दिला. मराठी भाषिकांच्या हक्कासाठी कार्यरत असणाऱया शिवसेनेने यामध्ये लक्ष घालावे आणि न्याय द्यावा, अशी अपेक्षा मराठी भाषेत दुकान मालकांकडून करण्यात येत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्याला काळे फासले; कोल्हापुरी जोड्यांचा प्रसाद

shiv-sena

कन्नड रक्षक वेदिकाच्या माथेफिरू कार्यकर्त्यांनी बेळगावमधील मराठी बांधवांच्या दुकानावरील मराठी पाटय़ांवर दगडफेक केली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत कर्नाटकचा माजी राज्यमंत्री बसवराज होरट्टी याने अवमानकारक शब्द वापरले. याचे तीक्र पडसाद कोल्हापुरात उमटले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि होरट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला युवासैनिकांनी काळे फासून कोल्हापुरी जोडय़ांचा प्रसाद दिला.

बहाद्दर शिवसैनिकांनीही मस्तवाल भीमाशंकर पाटलाची तिरडीच उचलली

karnatak

एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गोळ्या घाला, असे चिथावणीखोर वक्तव्य करणाऱया कर्नाटक नवनिर्माण सेनेचा (कनसे)भुरटा अध्यक्ष भीमाशंकर पाटील याला कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग चार येथील कागल परिसरात मस्तवाल भीमाशंकर पाटलाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी यात्रा काढून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी आम्ही कर्नाटक सीमारेषेवर आलो आहोत. हिंमत असेल तर गोळी झाडून दाखवा, असे थेट आव्हान दिले.