
कोकणचा कॅलिफोर्निया नव्हे तर कॅलिफोर्नियाला आपला कोकण व्हावं असं वाटलं पाहिजे. कोकणचं निसर्गसौंदर्य हे वैभव जपून जगासमोर आणणं हे आपलं काम आहे. इथला समृद्ध निसर्ग घालवून जर आपण कृत्रिम प्रकल्प आणत असू तर त्यासारखे दुसरे वैचारिक दारिद्रय़ नाही. एखाद्या प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे नाही असे ठणकावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणबुडीतून समुद्रतळाचे दर्शन, जलदुर्गांची सफर यासारख्या प्रकल्पांतून पर्यटनाचा विस्तार करण्याची स्पष्ट भूमिका विधानसभेत मांडली.
कोकण विकासाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत उत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, कोकण हा आमचा कायम जिव्हाळ्याचा विषय आहे. 8-10 दिवसांपूर्वीच कोकणला गेलो तेव्हा सर्वांचेच श्रद्धास्थान असणाऱया आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे दर्शन घेतले. तेव्हा पक्षभेद विसरून तिथे सर्व एकत्र आले. तिथे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्याच्या लोकप्रतिनिधींता बोलावलं होतं. जे लोकप्रतिनिधी या बैठकीला आले त्यांना तिथे काय झालं माहीत आहे. जे आले नाहीत त्यांना ते कळणार नाही असा टोला लगावतानाच उद्धव ठाकरे यांनी ज्या ठिकाणी मी जातो तिथे राजकारण न आणता जनतेच्या हिताचं जे जे काही करता येईल ते करण्याचा, तिथले अनिर्णीत प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असतो असे स्पष्ट केले.
अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्यस्तरावर कायदा करणार
कोकणात मोठय़ा प्रमाणावर ज्याप्रमाणे पारंपरिक मासेमारी केली जाते त्याप्रमाणेच अपारंपरिक मासेमारीही केली जात आहे. यात एलईडीद्वारे मासेमारीचे प्रकार वाढले आहेत. या एलईडी लाइटवर बंदी आणण्यासाठी हे सरकार प्रयत्न करीत आहेत. यासाठी केस्टगार्ड, स्थानिक पोलीस यांनी एकत्र येऊन काम करायला हवं. यासंदर्भात कायदा करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
1 मेपासून चिपी विमानतळ कार्यान्वित; पाणबुडीद्वारे समुद्रसौंदर्याचे दर्शन
कोकणचा किनारपट्टा म्हणजे पर्यटन. या पर्यटनाचा विस्तार करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. येथील चिपी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत उपकरणं लावल्यानंतर चाचणी वगैरे होऊन 1 मे या संयुक्त महाराष्ट्र दिनी कोणत्याही परिस्थितीत विमानतळ सुरू करू अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. गोव्यापेक्षा निळाशार समुद्र कोकणाला लाभला आहे. पर्यटकांसाठी ज्या गोष्टी अंडरवॉटर मरीनलाइफ दाखविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे त्यासाठी पाणबुडीच्या माध्यमातून समुद्रसौंदर्याचे दर्शन लोकांना देण्याची योजना सरकार आखत आहे. त्याचप्रमाणे एलिफंटापासून कोकणपर्यंत असलेल्या जलदुर्गांचे दर्शन घडविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विकास करताना काय कमावणार, काय गमावणार याचा आढावा घ्यायला हवा!
अनेकदा एखादा प्रकल्प येतो, विकास हा गोंडस शब्द येतो. प्रकल्पाला विरोध केला म्हणून विकासाचे मारेकरी होत नाही. विकास करताना आपण काय कमावणार, काय गमावणार याचा आढावा घ्यायला हवा. कोकण किनारपट्टीवर प्रकल्प आणणार असू. निसर्ग घालवून जर कृत्रिम प्रकल्प आणण्याचा विचार करीत असू तर त्यासारखे दुर्दैव नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी ‘नाणार रिफायनरी’चे नाव न घेता लगावला.
नुसती बोलाची कढी आणि बोलाचाच भात असं करणार नाही
आंबा-काजू बोर्डाबद्दल नुसती चर्चा करणार नाही तर चर्चेवर प्रक्रिया करून ते प्रत्यक्ष आणण्याचे निर्देश दिले आहेत. बोलाची कढी आणि बोलाचाच भात करून चालणार नाही. ठरावीक दिवसांत ही योजना प्रत्यक्षात आली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या एप्रिलमध्ये कोकणात व्हायरॉलॉजी लॅब सुरू करीत आहोत. चांगली हॉस्पिटल आवश्यक आहेत ती देत आहोत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात वाइल्ड लाइफ, तसेच तिलारी धरण परिसरात कन्झर्व्हेशन रिझव्हॉयर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.






























































