
राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो.#लसीकरण
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 9, 2021
त्यांनी सांगितले की, राज्यात लसीची पहिली मात्रा 6,80,53,077 तर दुसरी मात्रा 3,20,74,504 देण्यात आल्या आहेत. एकूण 10,01,27,581 लस मात्रा देण्यात आल्या आहेत. या यशात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबरच लसीकरण मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.
टोपे यांनी सांगितले की, लसीकरणाच्या मोहिमेस गती देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच हा टप्पा पार करता आला. लवकरच राज्यातील प्रत्येक नागरिकाला लशीच्या दोन्ही मात्रा देण्याचे उद्दिष्ट आहे.
राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस सोळा जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येऊ लागले. लसीकरणाच्या वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य अशी अभियान राबविण्यात आले.
लसीकरणात 10 कोटींचा टप्पा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. मुंबईत लसीकरणाने l कोटी 49 लाखांचा टप्पा गाठला आहे. या यशाबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी यंत्रणांचे अभइनंदन केले आहे.
































































