हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न -बाळासाहेब थोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला. मुंबईत बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हाथरस येथील दलित तरूणीवरील बलात्कार आणि हत्ये प्रकरणी उत्तर प्रदेश भाजप सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची भूमिका संशास्पद असून हे प्रकरण दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केला.

काँग्रेसने सोमवारी मुंबई, पुणे, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, नागपूर ,बुलढाणा, यवतमाळ, सिधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, परभणी, भिवंडी अकोला येथे हाथरस येथील दुर्दैवी घटनेप्रकरणी सत्याग्रह आंदोलन केले. याविषयीची माहिती देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपच्या राज्यात दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावर अत्याचार वाढले असून त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी  करावी आणि हाथरसच्या जिल्हाधिकाऱयावर कारवाई करावी या काँग्रेसच्या मागण्या आहेत. काँग्रेस त्या पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष करत असून हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरुच राहिल, असे त्यांनी सांगितले.