राज्यात दिवसभरात 7 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश येत असून राज्यात आज दिवसभरात 7 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर पोहोचला आहे तर कोरोना रुग्णांचे संख्या कमी झाली असून दिवसभरात 3 हजार 75 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी अनेक मोहिमांबरोबरच विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून मृत्यूदरातही लक्षणीय घट झाली आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.57 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 13 लाख 18 हजार 721 चाचण्या झाल्या असून 18 लाख 55 हजार 341 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 5 लाख 55 हजार 180 जण होम कोरेंटाईन असून 5 हजार 565 जण संस्थात्मक कोरेंटाईन आहेत.

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 544 रुग्ण; 1,598 कोरोनामुक्त, 11 जणांचा मृत्यू

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सलग नऊव्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या हजारच्या आत आली आहे. आज दिवसभरात 544 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 1,598 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध दीर्घकालीन आजार असलेल्या 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत 11 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 913 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 62 हजार 789वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 280 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 12 हजार 65 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 19 लाख 98 हजार 764 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 86 हजार 590 वर पोहोचली आहे.